लखनौ : दाट धुक्यामुळे सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील हापूर-बुलंदशहर महामार्गावर एक डझनहून अधिक वाहनांची एकमेकांना धडक बसली. राष्ट्रीय राजधानीपासून (दिल्ली) सुमारे ८६ किलोमीटर अंतरावर हापूरच्या हाफिजपूर कोतवाली भागात हा अपघात झाला. या अपघाताशी संबंधित एक व्हीडीओही समोर आला असून ज्यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झालेले दिसत आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, बहराइच जिल्ह्यातील कोतवाली देहाट भागात बहराइच-श्रावस्ती रस्त्यावर सोमवारी सकाळी डबल डेकर बस आणि तांदूळ भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. बहराइचचे जिल्हा दंडाधिकारी मोनिका राणी आणि पोलीस अधीक्षक (एसपी) प्रशांत वर्मा घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य आणि जखमींच्या उपचारांची माहिती घेतली.