नवी दिल्ली : गेल्यावर्षी गव्हाला उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. मात्र, यावेळी बहुतांश शेतकरी हवामानाला अनुकूल गव्हाच्या वाणांची लागवड करत आहेत. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू रब्बी हंगामात २२ डिसेंबरपर्यंत ३ कोटी ८.६ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडी घट झाली आहे. मागील वर्षी ३ कोटी १४.४ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.
एकूण पेरणी क्षेत्रापैकी ६० टक्क्यांहून अधिक भागात या नवीन वाणांची पेरणी झाली आहे. कृषी आयुक्त पीके सिंह यांच्या मते, मार्च २०२२ मध्ये तीव्र उष्णतेमुळे उत्तर आणि मध्य भारतीय राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. गहू हे मुख्य रब्बी (हिवाळी) पीक आहे, ज्याची पेरणी साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि काढणी मार्च-एप्रिलमध्ये केली जाते. तसेच काही भागात गव्हाची पेरणी लांबणीवर पडली असून, भात कापणीला उशीर झाला आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी गहू पिकण्याच्या वेळी सरासरी तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन सरकारने हवामान अनुकूल गव्हाचे वाण बाजारात आणले आहे.
उष्णता सहन करणाऱ्या वाणांची पेरणी केली
कृषी आयुक्त म्हणाले की, आम्ही उद्दिष्ट ओलांडले आहे कारण आतापर्यंत ६० टक्क्यांहून अधिक पीक क्षेत्रावर उष्मा सहन करणाऱ्या वाणांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या वाणांची पेरणी केवळ ४५ टक्के क्षेत्रावर झाली होती. यामुळे गहू पिकण्याच्या वेळी सरासरी उष्णतेच्या वाढीच्या समस्येला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल, असे ते म्हणाले.