मुंबई (प्रतिनिधी) : देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. आपण पुन्हा चूक केली तर देशात हुकुमशाही येईल. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी दरवाजावर आलेली हुकुमशाही उंबरठ्यावर रोखण्याची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
जैन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, सगळे जण विचार करीत असतील निवडणूक जवळ आली असल्याने हे येणारच, मत मागण्यासाठी आले असणार; पण मी आज येथे धर्मगुरू आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, तुम्हा सर्वांचे सहकार्य पाहिजे आहे; पण ते देशासाठी, असे सांगतानाच, सध्या देश एका कठीण संकटातून जात आहे. देशाला कोण वाचवणार?, असा सवाल उपस्थित करीत, या वेळी आपण चूक केली तर देशात हुकुमशाही येईल. हुकुमशाही आली तर देशातील सद्भावना, नितीमत्ता संपून जातील, अशी भीतीही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
देश संभ्रमावस्थेत आहे. पुढे काय करावे? कोण वाचवणार? असे अनेक नानाविध प्रश्न लोकांसमोर आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देशात सद्भावना हवी, नितीमत्ता हवी याच बरोबर आपल्या देशाला आता स्वातंत्र्याची गरज असल्याचे म्हणाले. या पूर्वी आपण स्वातंत्र्याची लढाई लढलो आणि जिंकलोसुद्धा आहोत; परंतु आता तेच स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत आणि यामध्ये आपले सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.