नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले आहे. संजय सिंह यांनी निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही जाऊन सरकारला भेटू, सरकारशी बोलू आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर सल्लाही घेऊ, कारण आम्ही निवडणुका लोकशाही पद्धतीने जिंकल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली असून ते बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
ते म्हणाले की, विरोधकांनीही निवडणुकीत भाग घेतला आहे. निरीक्षकांच्या देखरेखीखाली निवडणूक पार पडली असून ४७ मते पडली आहेत. त्यापैकी मला ४० मते तर विरोधकांना ७ मते पडली. माझे काम लोकशाही पद्धतीने झाले. निलंबन फेटाळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते की, आता माझा कुस्तीशी संबंध नाही, मी कुस्तीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे.