नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला कोरोना संशयित आढळल्याने तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सिन्नर व दोडी येथून दोन रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, महिलेचा कोरोना व्हेरिएंट तपासणीसाठी जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. तर, इतर दोन रुग्णांचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. परंतु, खबरदारी म्हणून जिल्हाभरात रुग्णांसंदर्भातील ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’सुरू केल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
त्र्यंबकेश्वरमधील एका महिलेला कोरोनाच्या ‘जेएन वन’ संसर्गाची लागण झाल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, सदर महिलेला कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रुग्णालयात तिच्यावर प्रसूतीपूर्व उपचार सुरू होते. प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने तीन दिवसांपूर्वी महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी रुग्णाला काही प्रमाणात खोकला व कफ जाणवल्याने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. त्यात महिला कोरोना संशयित असल्याचे समोर आल्याने ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरच नाशिकमध्ये कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाली का, हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा शासकीय रुग्णालयाने खबरदारी घेत सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.