मुंबई : प्राथमिक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अंगणवाड्यांमध्ये औषधांचे संच उपलब्ध करून दिले जातात. माफक दरामध्ये उत्तम संच उपलब्ध करून देणे अपेक्षित असले तरीही नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडून अंगणवाड्यांसाठी करण्यात येणा-या या संचांच्या प्रस्तावित खरेदीमध्ये दहा कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. सध्याच्या निविदा प्रक्रियेत एका संचाची प्रस्तावित किंमत ही जवळपास चौदाशे रुपये ठरविण्यात आली आहे. मुख्य आणि लघु असे दोन प्रकारचे संच यात उपलब्ध असणार आहेत. उत्तम दर्जाचे हे संच बाजारामध्ये पाचशे रुपयांना उपलब्ध आहेत. त्यामुळे चौदाशे रुपये ही किंमत कोणत्या निकषांवर निर्धारित करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जेम पोर्टलवर यासंदर्भात निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. मुख्य किटमध्ये ९७ हजार ४७५ तर लघु किटमध्ये १२ हजार ९७१ किटची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. एकूण १ लाख १० हजार ४४६ संचांच्या खरेदीसाठी सोळा कोटी रुपये प्रस्तावित किंमत ठरविण्यात आली आहे. उत्तम दर्जाचे हे संच पाचशे रुपये दराने विकत घेतले तरी याची किंमत साडेपाच कोटी रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे या प्रस्तावित किमतीनुसार अतिरिक्त दहा कोटी रुपयांचा भुर्दंड यात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. डांगे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता नुकताच पदभार स्वीकारल्यामुळे यासंदर्भात सुस्पष्टता नसल्याचे व माझ्या कार्यकाळामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
या संचामध्ये डिजिटल थर्मामीटर आहे. मात्र तापासाठी कोणतेही औषध यामध्ये नाही. कापूस तसेच बँडेजची उपलब्धता ही महाराष्ट्रातील पुरवठादारांनी करणे अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या संचात मुलांसाठी औषधांची उपलब्धता करण्यासाठी हाफकिन महामंडळानंतर या नव्या प्राधिकरणाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. प्रस्तावित दरनिश्चितीसंदर्भात कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही.
संचांमध्ये कोणकोणत्या वस्तू
या संचांमध्ये फोल्ंिडग आयोडिन जेल, ओआरएस पावडर, झिंक सिरप, अॅन्टीसेप्टिक लोशन, डोळ्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून वापरण्यात येणारे फ्लोरा औषध, डिजिटल थर्मामीटर, कॉटन बँडेज यांसारख्या औषधांचा समावेश आहे.