बंगळुरू : कन्नड रक्षण वेदिकेच्या (केआरव्ही) कार्यकर्त्यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये दुकानांच्या पाट्या ६० टक्के कन्नड भाषेत नसल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तोडफोड केली. या लोकांनी लाठ्या-काठ्यांचा वापर करून दुकानांचे दिवे, फलक तोडले आणि दगडफेकही केली. अनेक कार्यकर्ते ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देताना दिसले. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई केली. कन्नड भाषेच्या नियमावरून बेंगळुरूमध्ये तणाव निर्माण झाला.
प्रथम काही कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील मोठ्या मॉलमध्ये जमून प्रवेशद्वाराचे तसेच काही दुकानांचे नुकसान केले. यानंतर छोट्या गटातील काही कार्यकर्त्यांनी यूबी सिटी, चर्च स्ट्रीट, गोपालन मॉल या मुख्य भागात तोडफोड सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून, ग्रेटर बेंगळुरू महानगरपालिकेचे (बीबीएमपी) अधिकारी दुकानदारांना सांगत होते की, त्यांच्या दुकानातील ६० टक्के साइनबोर्ड कन्नड भाषेत आणि बाकीचे इंग्रजीत असावेत.
केआरव्हीचे आयोजन सचिव अरुण जवागल यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही दुकानदारांना नियमांचे पालन करण्यास सांगत आहोत. आम्ही बीबीएमपीला कर्नाटक शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट नियम, १९६३ च्या तरतुदी लागू करण्यास सांगत आहोत. पण काही मॉल मालकांनी आम्हाला कायदेशीर नोटिसा पाठवल्या असून आम्ही त्यांना नियम सांगणारे कोण आहोत, असे ते म्हणत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यावरील मॉल ऑफ एशिया येथे आंदोलन सुरू होण्याचे हे एक कारण आहे.
व्यापारी असोसिएशनच्या एका सदस्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, आम्हाला प्रत्यक्षात ६० टक्के कन्नड भाषेतील साइनबोर्डच्या नियमाची माहिती नव्हती. आम्ही अलीकडेच आमच्या सदस्यांना हा नियम लागू करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही २५ डिसेंबर रोजी याबाबत ट्विट केले आणि दुकानदारांना २८ फेब्रुवारीपासून या नियमाचे पालन करण्यास सांगितले आहे. अरुण जवागल म्हणाले की, केआरव्ही काही दुकानदारांच्या वृत्तीवर नाराज आहे, ज्यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित केला आणि आम्हाला सांगितले की ते कर भरतात.