लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही सवलत योजना राज्य परिवहन महामंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या असून महामंडळाच्या तिजोरीत दरमहा भर पडत आहे. या योजनेमुळे लातूर जिल्ह्यात एस. टी.ने प्रवास करणा-या महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून उत्पन्न वाढत असल्याने एस. टी.ला कुबेर प्रसन्न झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यात एस. टी.चे मोठे जाळे विणले गेले आहे तसेच लातूर जिल्ह्यातही लातूर, औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर या ५ आगारांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात गाव तेथे एस. टी. पोहोचलेली आहे. प्रत्येक गावात पोहोचणारे हक्काचे साधन म्हणून एस. टी.कडे पाहिले जाते. स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, दिव्यांग यांच्यासह ३१ घटकांना एस. टी.च्या वतीने सवलतीच्या दरात तिकिट दर आकारला जात आहे. या तिकिट दरातील फरक हा शासनाच्या वतीने एस. टी. महामंडळास अदा केला जात आहे. महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर एसटी महामंडळाच्या लातूर विभागाने दि. १६ मार्च २०२३ रोजी घेतला तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर राज्यभरातील बसमध्ये महिला प्रवाश्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढण्यास सूरुवात झाली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर लातूर जिल्ह्यातील महिलानी दि. १६ मार्च २०२३ पासून ते २७ डिसेंबर २०२३ पर्यंत या १० महिन्यात सुमारे ०१ कोटी ३५ लाख ९५ हजार ४८९ महिला प्रवाश्यानी प्रवास केला आहे. राज्य सरकारने महिलांना ५० टक्क्याची सवलत दिल्यानंतर लातूर जिल्यातील सर्व बस स्थानकावर तसेच बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. यात ताई, माई, अक्का, काकू, मावशी आणि आजीही प्रवासाला निघाल्या आहेत. यात कुणी देवदर्शनाला जात आहे. तर, कुणी वास्तुशांतीसाठी जाते आहेत. तर काही पर्यटनासाठी निघाले तर कोणी रोजच्या प्रवासातमुळे होणा-या वैयक्तिक खर्चात कपात करण्यासाठी निघाल्या आहेत. कुणी रुग्णालयात तर कुणी बाजारला निघाले आहेत. सर्वच महिला आपआपल्या घरातील कामधाम आटोपून सकाळीच या महिला तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जात असलेल्या दिसून येत आहेत. यात साधी बस असो की शिवशाही या गाडीमध्ये अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशाची संख्या आता वाढली आहे.