मुंबई : संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी त्यांनी भूमिका मांडत राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी संपूर्ण देशाला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडत आहेत. राहुल गांधींकडे चेहरा आहे. त्यांचा संघर्ष सुरु आहे. लोकांना असा संघर्ष करणारा नेता आवडतो. ते खोटे बोलत नाहीत, प्रामाणिक आहेत, देशभक्त आहेत. पंतप्रधान होण्यासाठी अजून कोणते गुण हवेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तसे वाटत असल्यास काही चुकीचे नाही. पण इंडिया आघाडी एकत्र काम करत असल्याने युतीचा चेहरा कोण आहे हे ठरवू, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, आमचे काही म्हणणे नाही, राम सर्वांचे आहेत. पण असे राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल. असे कृत्य करु नका, नाहीतर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील, असे राऊत म्हणाले. आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाहीत. तो भाजपाचा कार्यक्रम आहे. तो १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचा कार्यक्रम नाही. हा पक्षीय कार्यक्रम आहे. राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातले असते. त्यांना झेंडा फडकवू द्या, फोटो काढू द्या.