मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारीपक्षासहित विरोधी पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १२+१२+१२+१२ जागेचा फॉर्म्युलाच्या प्रस्ताव पाठवला आहे. आंबेडकरांच्या या प्रस्तावानंतर मविआत जागावाटपाचे गणित बिघडले असून आता यावर माविआ काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक ३१ डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. या बैठकीत ‘वंचित’ला महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे. लोकसभा जागावाटप संदर्भात काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार आहे. उद्धव ठाकरेंची ही चर्चा २ किंवा ३ जानेवारी रोजी होणार आहे.