मुंबई : मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होते. समुद्र किनाऱ्यांवर फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचे स्वागत केले जाते. यासाठी हजारो मुंबईकर मुंबईच्या चौपट्यांवर दाखल होतात. अनेकजण मुंबईत पार्टी करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि बेस्ट बस प्रशासनाकडून ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. नववर्षाच्या आगमनाकरिता मुंबई पोलीस सज्ज झाले असून ३१ डिसेंबरला मुंबईच्या रस्त्यावर तब्बल ११,५०० पोलीस असणार तैनात आहेत.
नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा याकरीता पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई पोलीस दलाकडून २२ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २०५१ पोलीस अधिकारी आणि ११५०० पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्यूआरटी टीम्स, आरसीपी, होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.