मॉस्को : भारताच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत रशिया अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या उत्पादनासाठी तयार आहे, अशी ग्वाही रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी दिली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.
पाच दिवसांच्या रशिया दौ-यात जयशंकर यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. बुधवारी रात्री त्यांनी रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपली महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची घनिष्ठ मैत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला तर निश्चितच आनंद वाटेल, असे पुतीन म्हणाले. पुढील वर्षी पंतप्रधान मोदी रशियाचा दौरा करतील.