धाराशिव : प्रतिनिधी
व्याजाने दिलेले पैसे व्याजासह परत दे, नाहीतर तुझी पत्नी व मुलीला घेऊन जाईन, अशी धमकी सावकाराने दिली होती. त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथील अण्णासाहेब केरबा काळे या शेतक-याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून दि. १८ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी संभाजीनगर, डिकसळ ता. कळंब येथील सावकार गोविंद बाबूराव काळे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाणे येथे दि. २८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही, मला माफ करा, लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले असते तर मी आत्महत्या केली नसती, अशी चिठ्ठी सोशल मीडियावर टाकून सोमवारी दि. १८ डिसेंबर रोजी पहाटे कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील तरूण शेतकरी अण्णासाहेब काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सावकाराच्या कर्जाला कंटाळून व तेरणा सहकारी साखर कारखान्याने मदत न केल्याने कंटाळून अण्णासाहेब काळे यांनी जीवन संपविले होते. आत्महत्या करण्यापुर्र्वी त्यांनी सोशल मीडियावर चिठ्ठी टाकली. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सावकार, तेरणा साखर कारखान्याचे संबंधित अधिकरी यांची नावे लिहून, त्यांनी कसा छळ केला, याची माहिती नमूद केली होती. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनाही या पत्रातून आपल्या तेरणा साखर कारखान्याने जर मदत केली असती तर मी आत्महत्या केली नसती, असा उल्लेख केला होता.
कळंब तालुक्यातील डिकसळ ते पिंपळगाव रोडवर फॉरेस्टच्या गायरान जवळ विठ्ठल रघुनाथ बारगुळे यांच्या शेताच्या कडेला लिंबाच्या झाडाला गळफास घेवून अण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली. सावकार असलेला आरोपी गोविंद बाबुराव शिंदे याच्याकडून अण्णासाहेब काळे यांनी व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे देण्याच्या कारणावरुन सावकाराने अण्णासाहेब काळे यांना मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. पैसे नाही दिले तर तुझी पत्नी व मुलगी यांना घेवून जाईन, अशी शिवीगाळ करुन धमकी दिली होती. सावकाराच्या जाचास व त्रासास कंटाळून, नैराश्यातुन अण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताचा मुलगा आकाश अण्णासाहेब काळे यांनी दि. २८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- ३०६, ५०४, ५०६ अन्वये सावकाराच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.