धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील कदेर येथील लोकमान्य टिळक विद्यालयातील एका शिक्षकाला आरोपीने खिचडीच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे आरोपी शिवप्रसाद दत्तात्रय दासिमे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब अनिल गायकवाड हे कदेर ता. उमरगा येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते दि. २८ डिसेंबर रोजी शाळेत कामकाज करीत होते. त्यावेळी आरोपी शिवप्रसाद दत्तात्रय दासिमे, रा. कदेर हे शाळेत गेले. त्यांनी शिक्षक बाळासाहेब अनिल गायकवाड यांना तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी चांगली देत नाहीत, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बाळासाहेब गायकवाड यांनी दि.२८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे कलम ३५३, ३३३, ५०४, ५०६, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.