मुंबई : (प्रतिनिधी) सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. पण ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नसतो, ती उलथवूनच टाकली पाहिजे, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. येणारे वर्ष संपूर्ण देशाला आनंदाचे, उत्साहाचे आणि भरभराटीचे व लोकशाही व्यवस्थेचे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी जनतेला दिल्या.
पुढील वर्ष निवडणूकीचे असल्याने प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिंदे गट व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, पाचो-यातील नेत्या वैशाली पाटील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील अघोषित हुकूमशाहीवर जोरदार टीका केली. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती बदललीच पाहिजे. त्या जिद्दीनेच मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. पण त्या सत्तेची भीती वाटत असेल तर अशी सत्ता उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठीच मी काम करत आहे. या कामात तुमच्या सारखे कार्यकर्ते सहभागी होत आहेत, त्यासाठी तुमचे सर्वांचे स्वागत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.