सोलापूर – शहरात दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी जुना पुना नाका ते पत्रकार भवन या पहिल्या फेजच्या उड्डाणपूल कामास भूसंपादनातील अडचणीमुळे विलंब होत झाला. दरम्यान, आता पहिल्या फेजच्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाकरिता ९० टक्के ॲवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे आता भूसंपादनाचे काम टप्प्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रस्ते आणि उड्डाणपूल कामास लोक पैसे घेऊनही भूसंपादनास तयार होत नाहीत. यामुळे भूसंपादनात अडचणी आल्याने विलंब होत आहे. जुना पुना नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते मोरारका बंगला असे दोन उड्डाणपूल होणार आहेत. त्यापैकी जुना पुना नाका ते पत्रकार भवन या पहिल्या फेजच्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत ९० टक्के अॅवॉर्ड आतापर्यंत प्रशासनाने जाहीर केले आहेत. या पहिल्या फेज भूसंपादनासाठी ९० कोटी रक्कम आहे.
उर्वरित ६५ कोटी रक्कम ही दुसऱ्या उड्डाणपुलासाठी लागणार आहे. दोन्ही उड्डाणपुलांसाठी शासकीय जागांचे संपादन करण्याकरिता संबंधित विभागांना पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्याचबरोबर उड्डाणपुलासाठी उर्वरित ५९ कोटी निधीसाठी नगरोत्थान योजनेंतर्गत शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यावरही कार्यवाही होईल, असे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यावेळी सांगितले.