मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत २० जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानेही आपल्या विविध मागण्यांसाठी २० जानेवारीलाच आंदोलन पुकारले आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. मात्र, मुंबईत एकाच वेळी दोन्ही समाज आमनेसामने येऊ शकतात. त्यामुळे २० जानेवारीला मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. तसेच दोन गटांतसंघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही थांबता थांबेना. त्यात आता मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २० जानेवारीपासून आंदोलनाची हाक दिली. २० जानेवारी पासून सुरू होणारे हे आंदोलन पुढे मुंबईत एकत्र होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळ, सकल मराठा समाज आणि संघटना यांच्याकडून सध्या मुंबईत तयारी सुरू आहे. या संदर्भात मुंबईत बैठकही झाली.
दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानेदेखील जातीय जनगणना, मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देऊ नये आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत आपली आंदोलनाची तयारी सुरु केली. ओबीसी जनमोर्चाने मुंबईत आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांना पत्र लिहिले आहे तर याच मैदानात मराठा शिष्टमंडळानेदेखील आपल्या आंदोलनासाठी पाहणी केल आणि तेदेखील या आझाद मैदानासाठी आग्रही आहेत.
पुन्हा एकदा मुंबईत एल्गार
मराठा आणि ओबीसी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आणि गेल्या अनेक वर्षांच्या समस्या घेऊन लाखोंच्या संख्येने पुन्हा एकदा मुंबईत एल्गार घेऊन येणार आहेत. त्यामुळे हे मुंबईला आणि राज्य सरकारला परवडणार नाही. तसेच सरकार आता या दोन्ही समाजाला सरकार कसे सांभाळून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.