मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, राष्ट्रवादीसोबत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे आणि वंचितबाबतचा निर्णयही दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. सर्व काही सुरळीत होईल. त्यामुळे कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका ३० एप्रिलच्या आत होणार आहेत. त्यांना कोणी तरी सांगितले की, ३० एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला तरच तुमचे काही तरी होईल, असे माझ्या कानावर आले आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी सुरळीत झाली आहे. ज्यावेळी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, त्यावेळी काँग्रेससोबतही बोलणे झाले आहे. त्यावेळी माझ्यासोबत संजय राऊत होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशीही याबाबत सविस्तर बोलणे झाले आहे. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होणार आहे. इथे जे काही बोलले जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण असा कोणताही निरोप मला त्यांच्याकडून आलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यासोबतच वंचित आघाडीबरोबर बोलणी सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना आणि वंचित, राष्ट्रवादी अशी बैठक घेण्याचे आमचे नियोजन आहे. १२-१२ जागांचा असा कुठलाही फॉर्म्युला माझ्यापर्यंत आला नाही. प्रत्यक्ष भेटून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दलचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मात्र, रामाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची गरज नाही, जेव्हा मला श्रीरामाचे दर्शन घ्यायचे आहे, तेव्हा मी घेईन, असे ठाकरे म्हणाले.
आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही
माझ्यात आणि इंडिया आघाडीत मी बिघाडी होऊ देणार नाही. मी कोण काय बोलत आहे, याकडे लक्ष देणार नाही, जोपर्यंत काँग्रेस अध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठी माझ्याशी याबाबत बोलत नाही, तोपर्यंत मी किंवा माझ्यासोबतचे इतरही याबाबत भाष्य करणार नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले.