नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट हिने तिला मिळालेले मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला. २६ नोव्हेंबर रोजी पुरस्कार परत करण्याची घोषणा तिने केली होती. शनिवार 30 डिसेंबर रोजी विनेशने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर कर्तव्य पथावर ठेवले. पोलिसांनी तत्काळ हे पुरस्कार ताब्यात घेतली. या घटनेचा व्हीडीओ कुस्तीपटू बजरंग पुनियाने शेअर केला आहे.
बजरंग पुनियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, विनेशने ‘कर्तव्या’च्या वाटेवर आपले पुरस्कार ठेवले. असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनात येवू नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून संन्यास घेत म्हटले की, बृजभूषणसारख्या व्यक्तीची पुन्हा निवड झाली तर काय करायचे? यानंतर बजरंग पुनिया यानेही पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला आहे. आता विनेश फोगाटने तिला मिळालेल्या पुरस्कार परत केले आहेत. पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंगनेही आपला पद्मश्री परत करण्याची घोषणा केली आहे.