अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तुरीचा दर गेल्या दीड महिनाभरात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारांत नवीन तुरीची आवक हळूहळू वाढू लागल्यानंतर तुरीचे दर अजून कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अकोल्याच्या कृषि बाजारात ४ नोव्हेंबरला तुरीला कमाल भाव १२ हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होता, अन् आजच्या तारखेत म्हणजेच काल शनिवारी प्रतिक्विंटल कमाल भाव ९ हजार ५९५ रुपयांवर आला आहे. यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून त्यात आयातवाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. पण, तुरीच्या दरवाढीसाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल, असा कृषि अभ्यासकांचा अंदाज आहे.
दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोल्यासह अनेक कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी १० ते ११ हजार रुपये तर कमाल भाव १२ हजारांवर प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते.
पण मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या भावात सतत घट होत गेली. ११ डिसेंबर रोजी तुरीला १० हजार १५५ किमान भाव तर सरासरी भाव ९ हजार ८०० रुपये इतका होता. त्यानंतर २१ डिसेंबरला कमीत कमी ७ हजार ४०० पासून जस्तीत जास्त ९ हजार ७०५ रुपये दर मिळाला. २९ डिसेंबर रोजी तुरीला किमान ६ हजार ते कमाल ९ हजार ८०० रुपये तर सरासरी ८ हजार रुपये भाव मिळाला.
काल शनिवारी म्हणजेच सध्या तुरीला किमान ६ हजार ७०० ते ९ हजार ५९५ रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवडाभरापासून ८ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहेत. दरम्यान काल शनिवारी २७३ क्विंटल एवढी तूर खरेदी झाली आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. ही आवक आणखी एक महिन्यानंतर जास्त होऊ शकते. बाजारात आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. त्यातच आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात केली जाणार आहे. यामुळे सध्या भाव कमी झाले आहेत, असे बाजार समितीतील आडते-व्यापा-यांचे म्हणणे आहे.