येरवडा : येरवडा कारागृहात पूर्ववैमनस्यातून चार कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याच्या पोटात कात्री भोसकून खून केल्याची घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सुरक्षेची सर्वतोपरी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
खून केलेल्या कैद्यांवर आणि त्यांच्या सहका-यांवर प्रतिहल्ला होण्याची शक्यता असल्याने कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशाने २० कैद्यांना बाहेरील जिल्ह्यातील कारागृहात स्थलांतरित केले आहे. कारागृहाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर ३० कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक बराकीची आणि संशयित कैद्यांची सुरक्षा रक्षकांकडून नियमित कसून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अनिकेत श्रीकृष्ण समदुर (वय २२), महेश तुकाराम माने (वय २४), आदित्य संभाजी मुरे (वय ३२) आणि गणेश हनुमंत मोटे (वय २४) या कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) याच्या पोटात कात्री भोसकून आणि बिजागिरीने मानेवर वार करून खून केला. कारागृहात कैद्यांनी कैद्याचा खून केल्याने मोठी खळबळ माजली होती. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा कारागृहातील खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खून करणारे कैदी आणि त्यांच्या साथीदारांवर चंदनशिवे टोळीतील किंवा साथीदारांकडून बदला म्हणून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खून करणारे कैदी आणि त्यांचे साथीदार अशा एकूण २० कैद्यांना येरवडा कारागृहातून प्रत्येक जिल्ह्यातील कारागृहात स्थलांतरित करण्यात आले.
येरवडा कारागृहात शिक्षा भोगणा-या कैद्यांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे असल्याने इतर कारागृहातून तीन अधिकारी आणि ३१ कर्मचा-यांना प्रतिनियुक्तीवर येरवडा कारागृहात बोलावून घेण्यात आले आहे. याशिवाय करागृहाच्या बाहेर आणि आतील तट भिंतींच्या सुरक्षेसाठी २२ होमगार्ड तैनात केले आहेत. कारागृहाबाहेर कैद्यांचे नातेवाईक आणि कैदी मुलाखतीला येणा-या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.