नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटने शनिवारी दिल्लीत कर्तव्य पथावर मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आपला निषेध व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच विनेश फोगट पंतप्रधान मोदींना खुले पत्र लिहून पुरस्कार परत करण्याबाबत सांगितले होते. विनेशने शनिवारी पंतप्रधान कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. आता राहुल गांधींनी ट्विट करत विनेशचा पुरस्कार परत करतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी लिहिले की, देशाच्या प्रत्येक मुलीसाठी स्वाभिमान प्रथम येतो, त्यानंतर कोणतेही पदक किंवा सन्मान.
आज एका ‘घोषित बाहुबली’कडून मिळालेल्या ‘राजकीय फायद्याची’ किंमत या शूर मुलींच्या अश्रूंपेक्षा जास्त आहे का? राहुल लिहितात, पंतप्रधान हे देशाचे रक्षक आहेत, त्यांच्याकडून अशी क्रूरता पाहून वाईट वाटते.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी बजरंग पुनियाची भेट घेतली होती. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील प्रमुख चेहरे आहेत.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. २१ डिसेंबर रोजी भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक पार पडली ज्यात बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांना ४७ मतांपैकी ४० मते मिळाली. मात्र, २४ डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंगच्या नेतृत्वाखालील कुस्ती संघटनेच्या पॅनलला निलंबित केले होते.