परभणी : जिल्हा पोलीस दलाने सरत्या वर्षात गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली असून २०२२ वर्षाच्या तुलनेत २०२३ मधील गुन्ह्यांच्या प्रमाणात जवळपास निम्म्याने घट झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी शनिवार, दि.३०पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी सांगितले की, स्ट्रीट क्राईम म्हणून ओळखल्या जाणा-या खून आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात जवळपास ५० टक्क्यांनी घट झालेली आहे. गतवर्षी खुनाचे ४८ गुन्हे दाखल होते. यावर्षी हे प्रमाण २६ इतके म्हणजे ५० टक्क्यांनी कमी होते. खुनाचा प्रयत्न १० टक्के कमी प्रमाण, जबरी चोरीचे गुन्हे निम्म्याने घटले.
याचे संपूर्ण श्रेय जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व कर्मच-यांना जाते. स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक महत्वाचे गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. जिल्ह्यात यावर्षी दुचाकी चोरीचे ६२ गुन्हे नोंद असून तडीपारीचे १० प्रस्ताव पाठविले असून यातील दोन मंजूरही झाले आहेत. ४६ दारू विक्रेत्यांवर कारवाईचे प्रस्ताव पाठविले असून दारूबंदी कायद्यांतर्गत १३०४ केसेस दाखल केल्या आहेत. यात ७८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगाराच्या ५८० केसेस दाखल करून १ कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळू चोरीच्या १७८ केसेस दाखल केल्या असून यातून ८ कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. गुटख्याच्या ७७ केसेस दाखल करण्यात आल्या असून १ कोटीपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणा-या ५ डीलर्स विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मोटारवाहन कायद्यानुसार ४१३ केसेस केल्या असून ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या ३३ हजार केसेस करण्यात आल्या आहेत. यातून १ कोटीपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.
गतवर्षी जिल्ह्यातून ७९ मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल होते. यावर्षी अशाप्रकारच्या ६१ तक्रारी दाखल केल्या असून यातील ८० टक्के मुलींना परत आणून पालकांच्या हवाली केले आहे. या सर्व मुली १५ वर्षांवरील असून यामागे कोणत्याही प्रकारची टोळी कार्यरत नव्हती तर या मुली निरनिराळ्या कारणांनी घर सोडून पळून गेल्याचे तपासात पुढे आले आहे.