जयपूर : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पदुकलन पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक कलयुगी मुलाने झोपलेल्या आई-वडील आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे, संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना मुलाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. दिलीप सिंग, राजेश कंवर आणि दिव्यांग प्रियंका अशी मृतांची नावे आहेत, ते पादुकलान शहरातील कुम्हारी परिसरातील रहिवासी होते. रात्री तिघेही घरी झोपलेले असताना कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. बिस्किटे खात मारेकऱ्याने रविवारी पोलीस ठाणे गाठले.
वृत्तानुसार, रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच पादुकलनचे एसएचओ मानवेंद्र सिंह यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि घटनेचा सविस्तर तपास केला. दरम्यान, तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पदुकलन रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हत्येचे कारण समोर आले आहे. मृत दिलीप सिंग यांच्या मुलाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचा संशय आहे. सध्या पोलिसांनी मृताच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. एसपी नारायण तोगस यांनी सांगितले की, आरोपीची मानसिक स्थिती स्थिर नाही. आताही हा खून केल्याबद्दल त्याला अपराधीपणाची भावना नाही.