लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणा-या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तेलंगणात सत्तांतर घडविण्याची जोमदार कामगिरी केली असली व इतर राज्यांतील मतदारांनी काँग्रेसला भरपूर मते दिली असली तरी तीन हिंदी भाषिक राज्यांतील भाजपच्या विजयाचा गवगवा तुलनेने जास्त झाला. भाजपचे प्रचारतंत्र, दिमतीला असणारी समाजमाध्यमी फौज व सरकारची तळी उचलण्यात धन्यता मानणारा प्रसार माध्यमातील एक वर्ग यामुळे असे एकांगी चित्ररंजन साहजिकच! भाजप अशा तंत्रात अग्रेसर आहेच. मात्र, या वातावरणनिर्मितीचा कितीही नाही म्हणले तरी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होतोच! तो टाळण्यासाठी व कार्यकर्त्यांचे, संघटनेचे मनोबल वाढविण्यासाठी या वातावरणास आव्हान देणारी कृती आवश्यक ठरते. निवडणुकीत भलेही पराभव झाला असला तरी मनाने आम्ही पराभूत झालेलो नाही तर उलट अधिक जोमाने संघर्षास तयार आहोत, हे ठणकावून सांगणे आवश्यक ठरते. काँग्रेसने पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या नागपुरातूनच ‘है तैयार हम’चा नारा देत भाजपला थेट आव्हान देऊन कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे व इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचेही मनोबल वाढविण्यात नक्कीच यश मिळविले आहे. देशात राजकीय नव्हे तर विचारधारेची लढाई सुरू आहे व काँग्रेस सामान्य भारतीयांच्या अविरत संघर्षातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे व लोकशाही व्यवस्थेचे जतन करण्यासाठी मैदानात उतरली आहे, हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितल्याने भाजपला तगडे आव्हान मिळाले आहे.
अर्थात भाजपही तयारीत मागे नाहीच. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेलीच होती. विरोधकांचे मनोबल खच्ची करायचे व त्याचवेळी तयारीत आघाडी घेऊन आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा निश्चित करत विरोधकांना आपल्या अजेंड्यावर खेळणे भाग पाडायचे असे भाजपचे तंत्र आहे. मागच्या दहा वर्षांत भाजपने हेच केले आहे व त्यात त्यांना यशही मिळाले आहे. यावेळीही भाजपची तीच तयारी सुरू आहे. राममंदिर सोहळ्याचा सध्या सुरू असलेला मोठा गाजावाजा हा अजेंडा सेट करण्याचाच एक भाग आहे. त्याला छेद देऊन विरोधकांनी मतदारांसमोर आपला अजेंडा जोरकसपणे मांडणे आवश्यक होते. त्या दृष्टीने काँग्रेसने स्थापना दिनाच्या मेळाव्यासाठी रा. स्व. संघाचे मुख्यालय असणा-या व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरची निवड करणे व या मेळाव्यातून विचारधारेच्या लढाईस काँगे्रस सज्ज असल्याचे रणशिंग फुंकणे यास मोठे महत्त्व आहे. या मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी व पक्षाध्यक्ष खरगे यांनी भाजप व रा. स्व. संघावर जोरदार प्रहार करून आपण या विचारधारेला शिंगावर घेण्यास व या संघर्षाचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश दिला. त्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल तर नक्कीच वाढणार आहे पण विरोधकांच्या इंडिया आघाडीतील मरगळही दूर होणार आहे.
सत्तेत आल्यास देशात जातगणना करण्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी पुन्हा उचलून धरला आहे. तो देशातील ओबीसी व इतर समाजांना आकर्षित करणारा व राममंदिराच्या निमित्ताने धार्मिक धु्रवीकरण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना उत्तर देणारा ठरणार आहे. याच मेळाव्यात खरगे यांनी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्यूनतम आय योजना अर्थात ‘न्याय’ योजनेची संकल्पना पुन्हा एकवार जोरकसपणे मांडली आहे. अर्थात या दोन्ही मुद्यांमध्ये नावीन्य काय? हे दोन्ही मुद्दे मतदारांनी अगोदरच नाकारले आहेत, अशी टीका निश्चितच होऊ शकते व होतेही आहे! मात्र, या टीकेला न जुमानता आम्ही जनतेच्या प्रश्नांसोबत आहोत, हे ठणकावून सांगण्याचे धारिष्ट्य काँग्रेसने दाखविले आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे निश्चितच अभिनंदन करायला हवे! अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा देशात कोणते वातावरण तयार करेल याचा अंदाज नक्की बांधता येणार नाही. मात्र, या निमित्ताने देशभर माहोल निर्माण करण्याची रा. स्व. संघ व भाजपची तयारी स्पष्टपणे दिसते आहे. त्याच्या जोडीला ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दाही भाजप आपल्या लोकसभा प्रचारात ‘वचनपूर्ती’ सांगत अग्रभागी ठेवणार हे स्पष्ट आहे.
भाजपच्या या ‘अजेंड्या’ला तोडीस तोड उत्तर देणारा अजेंडा विरोधकांकडून जनतेसमोर मांडला जाणे आवश्यक आहे अन्यथा विरोधकांना पुन्हा एकवार भाजपच्याच पिचवर खेळणे भाग पडू शकते. विरोधकांच्या नेतृत्वाची जबाबदारी असणा-या काँगे्रसने हे ओळखूनच १४ जानेवारीपासून राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची घोषणा केली आहे. हिंसाचाराने ग्रस्त मणिपूर राज्याची राजधानी असणा-या इम्फाळमधून या न्याय यात्रेचा प्रारंभ होईल. १४ राज्ये, ८५ जिल्हे व ६५ दिवस असा या यात्रेचा मोठा पैस आहे. ‘मणिपूर ते मुंबई’ या सहा हजार कि.मी. पेक्षा जास्त अंतराच्या या न्याय यात्रेद्वारे काँग्रेस भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या खेळीला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे उत्तर देताना काँग्रेस व राहुल गांधी यांनी यात्रेचा जो मार्ग निवडला आहे तो पाहता भाजपचे आव्हान पेलण्यास आपण पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेशच काँग्रेस देऊ इच्छिते. न्याय यात्रेचा मार्ग हा भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. या भागात काँग्रेसला मागच्या निवडणुकीत फारसे यश मिळालेले नाही. एका दृष्टीने यात्रेचा हा मार्ग निवडणे काँग्रेस व राहुल गांधी यांच्यासाठी एक आव्हानच आहे व राहुल गांधी यांनी हे आव्हान स्वीकारून भाजपला योग्य इशारा दिला आहे. त्यांनी स्वीकारलेल्या या आव्हानात भाजपच्या विचारधारेस विरोध असणा-या इतर राजकीय पक्ष व संघटनांचीही मनातून सक्रिय साथ मिळायला हवी.
तसे घडल्यास देशातले आज निर्माण करण्यात आलेले एकतर्फी वातावरण बदलण्यास अजिबात वेळ लागणार नाही. शिवाय इंडिया आघाडीतील आत्मविश्वास व एकजिनसीपणा यामुळे नक्कीच वाढेल. न्याय यात्रेत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सहभागी करून घेऊन राहुल गांधी त्यांच्यातला विश्वास वाढवू शकतात. थोडक्यात भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या खेळीला चोख उत्तर देण्याचा गृहपाठ काँग्रेसने यावेळी केलेला आहे. येती निवडणूक मुद्यांवरच लढवायची या निर्धाराने काँग्रेस मैदानात उतरली आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी ही विचारधारेची लढाई असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, विचारधारेची ही लढाई जिंकण्यासाठी अगोदर निवडणूक जिंकण्याचा पहिला टप्पा जिंकणे अपरिहार्यच आहे. त्याचाच विचार करून काँग्रेसने नागपुरातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवत भाजपला ‘है तैयार हम’चा संदेश दिला आहे. लोकशाही व्यवस्थेसाठी असे तगडे आव्हान अत्यंत आवश्यकच असते. त्यामुळे यासाठी काँग्रेसचे मतदारांनी मनापासून स्वागतच करायला हवे!