32.8 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामी

जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामी

टोकियो : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला असून त्यामुळे सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. भूकंपानंतर त्सुनामीच्या १.२ मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारपट्टीवर आदळल्या. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, सोमवारी उत्तर मध्य जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांताच्या किनारी भागात सुनामीचा इशारा दिला आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे इशिकावा प्रांतात ५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत.

जपानमध्ये त्सुनामीच्या ५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची भीती असताना किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, त्सुनामीग्रस्त भागात बचाव पथकही पोहोचली आहेत. जपानमधील सार्वजनिक प्रसारक एनएचकेच्या अहवालानुसार, इशिकावा प्रांतातील वाजिमा शहराच्या किनाऱ्यावर १ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या. जपानच्या अणुऊर्जा विभागाने म्हटले आहे की, अणुऊर्जा प्रकल्पात चौकशी सुरु आहे.

इमारती मजबूत भूकंप सहन करू शकतील याची खात्री करण्याच्या उद्देशाने जपानमध्ये कठोर बांधकाम नियम आहेत आणि मोठ्या धक्क्यासाठी तयार होण्यासाठी नियमितपणे आपत्कालीन सराव आयोजित केले जातात. परंतु मार्च २०११ मध्ये ईशान्य जपानमध्ये झालेल्या ९.० रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती. त्यामुळे सुमारे १८,५०० लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले होते.

३२ हजार घरांची वीज खंडित
इशिकावा प्रांतातील सुझू सिटीमध्ये अनेक घरे आणि विजेचे खांब पडल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, भूकंपाचा केंद्रबिंदू इशिकावा आणि राजधानी टोकियो दरम्यानची बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे. जपानमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर इशिकावा भागातील ३२ हजार ५०० घरांची वीज खंडित झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR