सोलापूर : बाळे येथील खंडोबा मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरातील गाभारा आकर्षक आणि सुगंधी फुलांनी सजविण्यात आला होता. मंदिरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. शिवाय मंदिर परिसरात पडलेल्या भंडारामुळे मंदिरा आकर्षक अन् मनमोहक दिसत होतं. एकूणच बाळे खंडोबा मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न झाल्याचे पाहावयास मिळाले.
दरम्यान, दयानंद महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात पोलिसांसोबत सेवा बजाविली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबरोबरच भाविकांना योग्य ते मार्गदर्शन करतानाही एनसीसीचे कॅडेटस दिसून आले. शहर पोलिस दलाबरोबरच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात चांगली सेवा बजाविली. बाळे येथील खंडोबाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविकांनी गर्दी केली होती.
बाळे येथील खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत तळी उचलण्यासाठी
भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. याशिवाय परडी भरण्यासाठी महिलांची रांग मोठ्या प्रमाणात दिसून आली, जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळी यासह अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
सायंकाळी सातच्या सुमारास बाळे मंदिरातून छबिना मिरवणूक निघाली, याचवेळी पालखी सोहळाही दिमाखात निघाला होता, जिल्हा परिषद शाळेजवळ लंगर तोडल्यानंतर पालखी व छबिना मिरवणूक पुन्हा मंदिरात आली. मंदिरात आल्यानंतर पुन्हा एकदा आरती करण्यात आली.
नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून अनेकांनी नववर्षाचा संकल्प करत खंडोबाचं दर्शन घेतलं. येत्या नववर्षात सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेकांनी खंडोबांकडे प्रार्थना केली. प्रामुख्याने खंडोबाच्या दर्शनासाठी तरूण, तरूणी, महिलावर्गाची मोठी हजेरी दिसून आली.