25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाटी-२० विश्व चषकचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी

टी-२० विश्व चषकचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी टी-२० विश्व चषक क्रिकेट स्पर्धा २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. स्पर्धेचे यजमानपद हे संयुक्तरित्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे आहे. आयसीसी टी-२० स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. एकूण ५५ सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना हा शनिवारी १ जून रोजी होईल. पहिल्या सामन्यात यूएस विरुद्ध कॅनडा आमनेसामने असतील, तर २९ जून रोजी महाअंतिम सामना पार पडणार आहे.

आयसीसी टी-२० विश्व चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे १० संघ थेट विश्व चषकासाठी पात्र ठरले. स्कॉटलँड,आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा या संघांनी पात्रता फेरीतून विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट मिळवले. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे यजमान आहेत. त्यामुळे या २ संघांना थेट तिकीट मिळाले.

विश्व चषक क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान १ ते १८ जून दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर १९ जून ते २४ जून दरम्यान सुपर ८ फेरी पार पडेल. २ सेमी फायनल सामने अनुक्रमे २६ आणि २७ जून रोजी पार पडतील. तर २९ जून रोजी विश्व विजेता ठरेल.

कोणत्या गटात कोणता संघ

आयसीसीने या टी-२० विश्व चषक क्रिकेटसाठी २० संघांना ४ गटामध्ये वर्गीकृत केले. त्यानुसार एका गटामध्ये ५ संघांचा समावेश करण्यात आला. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसएचा समावेश आहे. ब गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान आहे. क गटामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गुनिया आहे. तर ड गटामध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळचा संघ आहे.

भारत-पाकिस्तान ९ जून रोजी आमनेसामने
भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच म्हणजे अ गटात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या संघातील सामना हा ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR