कल्याण : ‘वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील ५ वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीची सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांच्या सणांचा आपण आदर केला पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. कधीही कोणाला वा-यावर सोडायचे नाही. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.
महिला धोरणावर काम सुरू
सत्तेत राहिलो तरच जनतेची कामे होतात. सध्या मंत्री आदिती तटकरे महिला धोरणावर चांगले काम करत आहेत. मेलो तरी चालेल पण सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. तरुण-तरुणींचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यासाठी नवी धरणे बांधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची साथ असली पाहिजे, असे मत अजित पवार यांनी नोंदवले.