अकोला : राज्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झाल्यानंतर आता इनकमिंगही सुरू झाले आहे. दरम्यान, बीड आणि अकोल्यातील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हाती शिवबंधन बांधले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काहीजण भटकंतीला बाहेर गेले आहेत, त्यांना आता घरात घेणार नाही. कारण जे खोक्यामध्ये बंद झाले, त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेप्रमाणे प्रेम दुस-या पक्षात मिळत नाही. हेच आपल्या शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम आणि जिद्द आहे. बाकीच्या गोष्टी पैशांनी विकत घेता येतात. आपुलकी, माया, हिंमत, प्रेम विकत घेता येत नाही. तुम्ही परत आपल्या घरात आलेला आहात. लढाई मोठी आहे. पण तुम्ही एकटवलात तर लढाई सोपी आहे. न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. खोके देणारे, खोके घेणा-यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीय, उद्धव ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे १३ जानेवारी रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. येथे ते शाखा भेटी घेणार आहेत. विधानसभेप्रमाणे ते शाखाभेट घेणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले. तर, २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त ते काळाराम मंदिरात जाणार आहेत.
नाशिकच्या राम मंदिरात जाणार
२२ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, ‘‘एक आनंदाची बाब ही आहे की २२ जानेवारी या दिवशी इतकी वर्षे ज्यासाठी संघर्ष करावा लागला होता, जवळपास २५ ते ३० वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आम्ही २२ जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाणार आहोत.