नवी दिल्ली : अयोध्येमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, प्राण प्रतिष्ठेपर्यंत राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाणार आहे. याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. पण, असं करण्यामागे एक धार्मिक महत्व आहे.
अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. यादरम्यान रामनगरीत यात्रा काढली जाणार आहे. यात राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे.
असे सांगितले जाते की, जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव आणि भक्त यांच्या नजरेच्या मिलनातून भावनांची देवाण-घेवाण होते. अशावेळी भगवान वशीभूत होतात आणि आपल्या प्रिय भक्तासोबत कोठेही जाण्यास तयार होतात. म्हणूनच या यात्रेदरम्यान रामलल्लाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. प्राण प्रतिष्ठेनंतरच ही पट्टी काढण्यात येणार आहे.
२२ जानेवारीपूर्वी अयोध्येमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखो लोक सहभागी होणार आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक देशभरातून अयोध्येच्या दिशेने पायी चालत येत आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी ८००० पेक्षा अधिक मान्यवर अयोध्येत येणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राण पतिष्ठा करण्यात येणार आहे.