29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeसोलापूरचिथावणीखोर भाषणांबद्दल नितेश राणे, टी. राजांवर गुन्हा दाखल

चिथावणीखोर भाषणांबद्दल नितेश राणे, टी. राजांवर गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापुरात शनिवारी (६ जानेवारी) रात्री झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाप्रसंगी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांच्यासह इतरांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हजारोंचा जनसमुदायासह निघालेल्या या मोर्चाप्रसंगी रस्त्यावर हुल्लडबाजी करून दगडफेकही करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्याचीही दखल घेऊन गुन्हा दाखल केला.

वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, यासह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस, टिळक चौक, कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार नितेश राणे व आमदार टी. राजा यांनी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारी आणि दुस-या धर्मियांच्या विरोधात चिथावणी देणारी भाषणे केली.

यातून अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे जेलरोड पोलिस ठाण्यात सहायक फौजदार देवीदास वाल्मिकी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आमदार राणे व आमदार राजा आणि सकल हिंदू समाज संघटनेचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे यांच्यासह सभेच्या व्यासपीठावरील अन्य आठ ते दहा पदाधिका-यांविरुध्द भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ), १८८ सह ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

हिंदू जन आक्रोश मोर्चा जात असताना त्यात भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य व आमदार विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला होता. मात्र ते शेवटी सभेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. मोर्चा मधला मारुती भागातून कोंतम चौकाकडे येत असताना वाटेत हुल्लडबाजी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काही विशिष्ट दुकानांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत काही निष्पाप व्यक्तींच्या डोक्याला दुखापत झाली. दुकानांतील साहित्याचेही नुकसान झाले. यासंदर्भातही पोलिसांत अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सतीश शिंदे व शेखर स्वामी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

यापूर्वीही कथित धर्मांतर, लव्ह जिहाद आदी मुद्यांवर सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असता रस्त्यावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. वादग्रस्त विधाने करण्यात आमदार टी. राजा आणि आमदार नितेश राणे हे आघाडीवर असतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली होती. पोलिसांनी सभेला परवानगी देताना आमदार राणे व आमदार राजा या दोघांसह आयोजकांना परवानगीतील अटी व शर्थींचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR