पुणे : मूकपट आला तेव्हा नाटक संपेल असं म्हटलं जायचं. पण नाटक संपलं नाही. नंतर बोलपट आल्यावरही नाटक संपलं नाही. टीव्ही आल्यावरही तीच चर्चा झाली. पण नाटक संपलं नाही. आता ओटीटी एकामागोमाग एक आले. पण नाटक संपलेलं नाही. तुम्ही चांगली नाटक दिल्याने हे घडलंच, पण तुम्ही समृद्ध रसिक निर्माण केल्यानं हे घडतंय, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं. आमचंही तसं आहे. आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची. मग आम्ही पोझिशन घेतो. पण एक आहे, चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो. तसं आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोकं घरी बसवतात, असं सांगतानाच महाराष्ट्राने एक गोष्ट पाहिली. २०१९ ला राज्यात एक प्रयोग झाला ‘कट्यार पाठीत घुसली’. काळजात नाही, पाठीत घुसली. मग २०२२ मध्ये आम्हीही प्रयोग केला ‘आता होती गेली कुठे?’ असे प्रयोग सुरूच असतात, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आम्हाला ती कला शिकवा
प्रशांत दामले म्हणाले की, नेते हे ३६५ दिवस २४ तास नाटकं करतात. तुम्ही बोलले त्यात थोडेफार तथ्य आहे. तुम्ही आता आम्हाला आपल्यातला एक समजता म्हणून तुम्ही आम्हालाही संमेलनाला बोलवता. तुम्ही अध्यक्ष झाल्यावर म्हणाले, मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. आता जरा ही कला आमच्या राजकारण्यांनाही शिकवा, म्हणजे अनेकांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटेल. त्यामुळं अनेक प्रश्नही मिटतील, असं फडणवीस यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
रामत्व कायम जपलं
जिथे केशरी वातावरण असतं, भगवे वातावरण असतं, तिथे आमचे मन रमतं. आज बघा ना आपला राजा पुन्हा आपल्या जन्मस्थळी विराजमान होतोय. आमच्या कला क्षेत्राने हे रामत्व कायम जपलंय. पहिल नाटक सीता स्वयंवर होतं. पहिला चित्रपट राजा हरिशचंद्र. पहिला बोलपट अयोध्येचा राजा. त्यामुळे रामापासून आपण वेगळे होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.