नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ व्या लोकसभेत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. लोकसभेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो.
कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खासगी विधेयक त्यांनी मांडली आहेत.