नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष अॅक्टिव्ह झाला आहे. मुख्यमंत्री अरव्ािंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरुच मतदारसंघातून आपच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा यांना आपने भरुच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे, अद्याप इंडिया आघाडीतील जागांचे वाटप झालेले नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत. यापूर्वी जनता दल युनायटेडने अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुची तांगुक, यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे.
कोण आहेत चैत्रा वसावा?
चैत्राभाई दामजीभाई वसावा डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची गुजरात विधानसभेत आपचे विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे कथित खंडणी आणि वन अधिका-यांवर हल्ला केल्याप्रकरणी वसावा तुरुंगात आहेत.