मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नावे आहेत.
निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून आपल्या अनियंत्रित मंत्र्यांना परदेशी नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी करण्यापासून इशारा दिला. मंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही त्यांची वैयक्तिक मते असल्याचे मालदीव सरकारने म्हटले होते. मात्र, सर्वांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांसंदर्भात घाणेरडी कमेंट केली त्यामुळे वाद चिघळला. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली. जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. चांगले पाऊल. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीझ यांनी म्हटले.