मुंबई : मुंबई पोलिस दलात सध्या एक पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर, बलात्कार लेटरबॉम्बबाबत मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘आठ महिलांनी पत्र लिहिले नसल्याचे पोलिसांनी म्हटले असून हे पत्र व्हायरल करणा-याचा शोध घेतला जात आहे. तसेच, सदर प्रकरणी आम्ही सखोल माहिती घेतली असता तथाकथीत अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापरे केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे समजून आले आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून व्हायरल होणा-या या पत्राने खळबळ निर्माण केली आहे. मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांनी पोलिस उपायुक्त, दोन निरीक्षक, तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे हे पत्र आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून सारवासारव केली जात असली तरी या ‘लेटरबॉम्ब’ने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करणा-याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबईचे पोलिस आयुक्त, सर्व पोलिस सहआयुक्त यांच्या नावाने पोस्टाच्या माध्यमातून धाडण्यात आलेल्या पत्राची प्रत शुक्रवारपासून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली. हाहा म्हणता संपूर्ण पोलिस दलात ते प्रत्येकापर्यंत पोहोचले. मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचा-यांचे नावे आणि सह्या या पत्रावर आहेत. चालक म्हणून कार्यरत असलेल्या या महिला पोलिसांनी वरिष्ठ अधिका-यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.