28.9 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘थ्री एम’ राबविणार

 निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘थ्री एम’ राबविणार

मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर यांच्यावर असलेला अभ्यास व कामाचा ताण यामुळे अनेक वेळा डॉक्टर नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे निवासी डॉक्टरांसह पदवी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘मार्ड’सोबत ‘थ्री एम’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टरांना भेडसावणा-या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘मार्ड’ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांची भेट घेतली. या वेळी ‘मार्ड’च्या पदाधिका-यांनी निवासी डॉक्टरांना भेडसावणा-या विविध समस्या कुलगुरूंसमोर मांडल्या. शैक्षणिक समस्येबरोबरच विद्यार्थी व शिक्षण यांच्यातील नातेसंबंधावरही चर्चा झाली.

‘मार्ड’च्या पदाधिका-यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर बैठकीत अधिक भर दिला. यावेळी डॉ. माधुरी कानिटकर यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ व ‘मार्ड’ने संयुक्तपणे सर्वंकष असा ‘थ्री एम’ कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ आणि मार्ड डॉक्टरांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी एक योजना तयार करतील. या माध्यमातून निवासी डॉक्टरांमधील कलागुण शोधून त्यांना चालना देऊन डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यात येईल.

डॉक्टरांवर असलेला प्रचंड मानसिक तणाव कमी करण्यासाठी मार्ड पुढाकार घेऊन ‘थ्री एम’ अंतर्गत सायंटिफिक क्लब, कला क्लब व छंद क्लब उभारतील. तसेच डॉक्टरांमधील तणाव कमी करण्यासाठी डॉक्टरांची ‘कोड ब्ल्यू टीम’ तयार करण्यात येईल, या तुकडीमध्ये मदत करण्याचे कौशल्य असलेल्या डॉक्टरांचा समावेश करण्यात येणार आहे. ‘कोड ब्ल्यू टीम’सोबत मार्ड मानसिक तणावाखाली असलेल्या डॉक्टरांना तणावातून बाहेर काढण्यास मदत करेल, असे यावेळी बैठकीमध्ये ठरल्याचे ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR