पाटणा : अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, राम मंदिरावरून तसेच निमंत्रणे देण्यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याला जायचे की नाही, यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये संभ्रम आहे. यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूू पक्षातील मंत्र्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली असून, निमंत्रण दिल्यास राम मंदिर सोहळ्याला जाणार असल्याचे म्हटले आहे.
जदयू नेते केसी त्यागी यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर बांधले जात आहे. हे मंदिर कोणत्याही राजकीय पक्षाने बांधलेले नाही. निमंत्रित केले या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून प्रतिनिधी पाठवायला हरकत नाही. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. अयोध्या मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्यास आम्ही निश्चितपणे कोणाला तरी उपस्थित राहण्यासाठी पाठवू, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही आम्ही न्यायालयाचा आदेश मान्य करू, असे सांगितले होते.
आता हे प्रकरण निकाली निघाल्यानंतर मंदिर बांधले गेल्याने आम्ही त्याचा आदर करतो. २२ जानेवारीला अयोध्येला कोण जाणार याने काही फरक पडत नाही. जर निमंत्रण नसेल तर आम्ही आमच्या वेळेनुसार तिथे जाऊ, असे केसी त्यागी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. अयोध्या मंदिराच्या मुद्द्याचे राजकारण करण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत त्याचे आश्चर्य वाटते. आता वेळ आली आहे की, भाजपाने मंदिर आणि धर्म यांचा वापर निवडणुकीची हत्यार म्हणून करणे थांबवावे. नितीश कुमार सरकारची धोरणे धर्मनिरपेक्षता प्रतिंिबबित करतात, असे जेडीयू नेते आणि बिहार राज्य धार्मिक बोर्डाचे सदस्य नीरज कुमार यांनी म्हटले आहे.