जेरुसलेम : गाझातील अतेरिकी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायली शहरावर हल्ला केला होता.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायली लष्कर उत्तर गाझावर सातत्याने हवाई बॉम्बफेक करत आहे. यामुळे गाझाचे मोठे नुकसान झाले आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की, हमास- इस्राईल संघर्ष सुरू झाल्यापासून गाझामधील मृतांची संख्या ९,०६१ झाली आहे. यामध्ये ३,७६० मुलांचा समावेश आहे तर ३२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच हल्ल्यानंतर हमासने इस्राईली नागरिकांचे अपहरण केले होते. अजूनही २४२ इस्राईली हमसच्या ताब्यात आहेत. हमासच्या हल्ल्यात १४०० इस्राईली लोकांचा मृत्यू झाला होता.
इस्राईली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण २४२ इस्राईली हमासच्या ताब्यात आहेत. यापूर्वी ही संख्या २३९ असल्याचे सांगितले जात होते. हमासने सांगितले की, गाझामधील विविध ठिकाणी बोगद्यांमध्ये बंदींना लपवण्यात आले असून इस्राईलच्या हवाई बॉम्बहल्ल्यात किमान ५० बंदी मारले गेले आहेत. बुधवारी हमासने सांगितले की, जबलिया निर्वासित छावणीवर केलेल्या हवाई हल्ल्यात सात बंदी मारले गेले आहेत.
हमासशी थेट चर्चा सुरू
थायलंडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी थायलंड सरकार हमासशी थेट चर्चा करत आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर थायलंडमधील अनेक नागरिक बेपत्ता असून किमान १९ थाई शेतमजुरांना हमासने बंदी बनवल्याचे मानले जात आहे. इस्राईलमध्ये २५ हजारांहून अधिक थाई कामगार शेतात आणि बागांमध्ये काम करतात. त्याईनी सांगितले की, त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी तेहरानमध्ये हमासच्या प्रतिनिधींशी भेट घेतली, जिथे त्यांना “योग्य वेळी” सोडण्यात येईल असे आश्वासन मिळाले.
बहरीनने राजदूताला परत बोलावले
इस्रायलचा नव्याने मित्र बनलेल्या अरब राष्ट्र बहरीनने गाझामधील हवाई बॉम्बहल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करत आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तत्पूर्वी, बहरीनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने माहिती दिली की, बहरीनमधील इस्राईलचे राजदूतही देश सोडून गेले आहेत आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही स्थगित करण्यात आले आहेत. २०२० मध्ये ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करणाऱ्या चार अरब लीग देशांपैकी एकाने इस्राईलविरोधी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.