नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिल्लीतील राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल उत्सवात सहभागी झाले. यावेळी ते दक्षिण भारतीय पारंपारिक वेशभूषेत दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी एक विधी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या कोटसह पांढ-या रंगाची लुंगी घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पंतप्रधानांनी आपल्या डाव्या खांद्यावर शालही घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पोंगल सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पोंगलच्या पवित्र दिवशी, तामिळनाडूतील प्रत्येक घरातून पोंगलची धारा वाहते. अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह वाहत राहो हीच सदिच्छा.
ते पुढे म्हणाले की, पोंगल सणात ताजे पीक देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आहे. या संपूर्ण उत्सवाच्या परंपरेच्या केंद्रस्थानी आपले अन्नदाते, आपले शेतकरी आहेत. भारतातील प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे गाव, शेती आणि पिकांशी संबंधित असतो.
ते पुढे म्हणाले की, संत तिरुवल्लूर यांनी म्हटले आहे की, चांगली पिके, शिक्षित लोक आणि प्रामाणिक व्यापारी मिळून राष्ट्राची उभारणी करतात. पोंगलच्या दिवशी पहिले पीक देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. आपले शेतकरी या परंपरेच्या केंद्रस्थानी आहेत. खरे तर आपले सर्व सण हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे शेतीशी संबंधित आहेत.