नवी दिल्ली : भारतामध्ये काळ्या रंगाचे आणि अंगावर लांब केस असलेले अस्वल आढळते. तुमच्यापैकी अनेकांनी हे अस्वल पाहिले असेल. मात्र भारतात पहिल्यांदाच दुर्मिळ असणारे तपकिरी रंगाचे तिबेटी अस्वल दिसले आहे. सिक्कीम वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कॅमे-यांनी सिक्कीमच्या डोंगराळ भागात या दुर्मिळ प्रजातीच्या अस्वलाचे छायाचित्र टिपले आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी त्या अस्वलाचे फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फोटो शेअर करताना आयएफएस अधिका-याने लिहिले की तुम्ही दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वलाचा पहिला फोटो पाहत आहात. यासह भारतीय वन्यजीवांमध्ये आणखी एका उपप्रजातीची भर पडली आहे. सिक्कीम वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ यांच्या संयुक्त प्रयत्नाने सिक्कीमच्या उंच भागात या प्राण्याचा शोध घेण्यात आला. याचाच अर्थ भारताचा बराचसा भाग अजूनही शोधायचा बाकी आहे.
या भागात आढळते
मिळालेल्या माहितीनुसार, पुचुंग ल्चेनपा, मंगन जिल्ह्यातील उंच भागात कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमे-यांनी डिसेंबर २०२३ मध्ये रात्रीच्या अंधारात या अस्वलाचे फोटो टिपले. हे अस्वल चेहरा, राहणीमाण आणि इतर बाबतीत हिमालयात आढळणा-या काळ्या अस्वलापेक्षा वेगळे आहे. हे अस्वल अल्पाइन जंगलात, गवताळ प्रदेशात आढळते आणि वनस्पती खाऊन जगते.
निळे अस्वल म्हणूनही ओळखले जाते
तिबेटी तपकिरी अस्वलाला तिबेटी निळे अस्वलदेखील म्हणतात. हे जगातील अस्वलाच्या दुर्मिळ उपप्रजातींपैकी एक आहे. हे अस्वल भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. नेपाळ, भूतान आणि तिबेटच्या पठारावर हा अनेकवेळा दिसून येते. दक्षिण आशियातील पश्चिम हिमालय, काराकोरम, हिंदुकुश, पामीर, पश्चिम कुनलुन शान आणि तियान शान पर्वतरांगांमध्येही या अस्वलाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.