मुंबई : राज्य आणि देशभरात मकरसंक्रांती सणाचा उत्साह आहे. तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन बोलत आहेत. पण या उत्साहाच्या वातावणाला काही ठिकाणी पतंग उडवण्याच्या मांजामुळे गालबोट लागले आहे.
बोरीवलीत मांजाने गळा कापून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मोहम्मद फारुकी असं त्याचं नाव आहे. मोहम्मद फारुकी दुचाकीवरून जात असताना त्यांचा मांजाने गळा कापला गेला. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी पतंग उडवणा-या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वसई विरारमध्ये 18 कबुतर जखमी
दरम्यान, नायलॉनच्या मांज्याने वसई विरारमध्ये 18 कबुतर जखमी झाले. विरारच्या करुणा ट्रस्टचे मितेश जैन यांनी मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करून, झाडावर, विजेच्या खांबावर तुटून पडलेल्या नायलॉनच्या मांज्यात अडकलेल्या 18 कबुतरांना जखमी अवस्थेत रेस्क्यू करून, त्यांच्यावर उपचार केले आहेत. मात्र यातील 3 कबुतरांचा मृत्यू झाला.
हैदराबादमध्ये जवानाचा मृत्यू
दरम्यान, हैदराबादमध्ये चिनी मांजाने गळा कापल्याने भारतीय सैन्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. नाईक कागीथला कोटेश्वर रेड्डी असं या 30 वर्षीय जवानाचं नाव आहे. मांजाने गळा कापल्याने हा जवान गंभीर जखमी झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मध्य प्रदेशात मुलगा ठार
मध्य प्रदेशातही अशीच घटना समोर आली आहे. मृत सात वर्षाचा बालक आपल्या आई-वडिलांसह बाईकने जात होता. यावेळी एका चौकात पतंगाच्या मांजाने त्याचा गळा कापला गेला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केलं.