ऑस्टिन : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच टेक कंपन्यांमध्ये काम करणा-या लोकांच्या नोक-या धोक्यात आहेत. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या कर्मचारी कपातीच्या तयारीत आहेत. काही काळापूर्वी गुगलने कर्मचा-यांना कामावरून काढून टाकत असल्याचे सांगितले होते.
यातच आता अॅपलने Siri साठी काम करणारी AI टीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये सध्या 121 कर्मचारी काम करत आहेत. AI टीम बंद करण्याच्या निर्णयानंतर अॅपलने कर्मचा-यांना ऑस्टिनला जाण्याचा पर्याय दिला आहे. कर्मचा-यांनी तसे करण्यास नकार दिल्यास कंपनी त्यांना कामावरून काढून टाकेल. यासाठी कर्मचा-यांंना फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
स्थलांतरास नकार देणा-यांना 26 एप्रिलनंतर कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अमेरिकेशिवाय या एआय टीमची कार्यालये भारत, चीन, स्पेन, आयर्लंडमध्येही आहेत.
ऑस्टिनमध्ये या टीमसाठी अनेक लोक आधीच काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात अॅपल अनेक कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कंपनीच्या या निर्णयामुळे आगामी काळात अनेक कर्मचारी कंपनी सोडून जाण्याची भीती आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत अॅपलमध्ये काम करणा-या एकूण कर्मचा-यांची संख्या 1,61,000 होती. कंपनीने असा दावा केला की प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी फारच कमी कर्मचारी कपात केली आहे.
गुगलनेही कर्मचारी कपातीची योजना बनवली आहे. गुगल असिस्टंट आणि कोअर इंजिनीअरिंग आणि हार्डवेअरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या टीमला कंपनी काढून टाकण्याच्या तयारीत आहे.