वॉशिंग्टन : आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) ४० टक्के नोक-या धोक्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ताज्या विश्लेषणात म्हटले आहे.
‘एआय’मुळे जगभरात विषमतेचे चित्र अधिक विदारक होणार असल्याचे ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्याकडून सांगण्यात आले.
‘जगभरातील नियोजनकर्त्यांनी या ट्रेंडचा गांभीर्याने विचार करूनच पुढची पावले टाकावीत तसेच या तंत्रज्ञानामुळे सामाजिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी, ‘एआय’च्या प्रसाराचे जसे फायदे आहेत तेवढीच जोखीमही त्यामुळे निर्माण होऊ शकते,’ असे जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे. ‘प्रगत देशांमध्ये ‘एआय’चा तब्बल ६० टक्के नोक-यांवर थेट परिणाम होणार आहे.
कर्मचा-यांना ‘एआय’चा लाभ होईल तसेच त्यामुळे त्यांची उत्पादकता देखील वाढेल,’ असे त्यांनी नमूद केले. ‘एआय’च्या स्वीकारानंतर उच्च उत्पन्न गटातील कामगार आणि तरुण कर्मचा-यांच्या वेतनामध्ये अचानक मोठी वाढ होईल. कमी उत्पन्न असलेले पण ज्येष्ठ कर्मचारी वेतनामानाच्या बाबतीत पिछाडीवर जातील, असे ‘आयएमएफ’कडून सांगण्यात आले.
‘काही देशांना ‘एआय’चे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा जाळी तयार करावी लागेल तसेच ज्या कर्मचा-यांना याचा धोका आहे त्यांना तातडीने प्रशिक्षण द्यावे लागेल. परिणामी ‘एआय’ मुळे होणारे स्थित्यंतर अधिक सर्वसमावेश होईल तसेच त्यामुळे लोकांचे रोजगारही जाणार नाहीत. हे बदल झाले तर विषमताही वाढणार नाही,’ असे जॉर्जिव्हा यांनी नमूद केले.