29.8 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू

राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : राज्यात गत वर्षभरात ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. २०२२ च्या तुलनेत अपघाती मृत्यूंमध्ये १.४ टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अपघातांचे ब्लॅक स्पॉटही गेल्या तीन वर्षांपासूून कमी झाले आहेत.
राज्यात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ लाख ५४ हजार ८७० अपघातांची नोंद झाली आहे.

त्यात ६८ हजार ११८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ८९ हजार ५९६ जण गंभीर जखमी झाले, तर ३८ हजार १२८ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. त्यात २०२२ मध्ये सर्वाधिक १३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला होता. तर गतवर्षी अपघातांमध्ये २.२ टक्के वाढ झाली. त्यानुसार ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाला.

अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना
इंटरचेंज पॉईंटजवळ ट्रॅव्हल्सची तपासणी केली जाते. त्यात अग्निशमन यंत्र, वाहनचालक परवाना, परमीट, प्रवासी संख्या, टायर स्थिती याची तपासणी केली जाते.
पोलिसांसह, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे संयुक्तरीत्या वाहनांची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना मदत केली जाते, बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाते.

पी. ए. सिस्टीममार्फत वाहनचालकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.
अपघात कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे.

अपघातप्रवण क्षेत्रं झाली कमी
राज्यात २०२१ मध्ये १ हजार चार अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होते. त्यानंतर २०२२ मध्ये ७४२ अपघात प्रवणक्षेत्र होते. सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रात दुरुस्ती, बदल करीत अपघात कमी करण्यावर भर दिल्याने ही क्षेत्र कमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR