लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अविष्कार २०२४ चा संशोधन विषयक स्पर्धेत येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाने विविध विद्या शाखेच्या गटातून पाच प्रकल्प सादर केले त्यापैकी एका दुर्मिळ अशा वनस्पतीपासून बायोडिझेलची निर्मिती या प्रकल्पास राज्यस्तरीय तृतीय बक्षीस प्राप्त करुन महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या वतीने दि. १२ ते १५ जानेवारीदरम्यान अविष्कार संशोधन स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक येथे केले होते. त्यात विविध संशोधन शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठाचे नेतृत्व केले होते. सदरील स्पर्धेत राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाज उपयुक्त्त विविध संशोधन प्रकल्प सादर केले. त्यात फरदीन आसिफ शेख, बीएससी तृतीय जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्याने डॉ. सचिन कुलकर्णी व डॉ. मनीषा धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दुर्मिळ अशा वनस्पतीपासून बायोडिझेलची निर्मिती करुन त्यांनी प्रकल्प सादर केला या प्रकल्पास तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले.
तसेच भक्ती भिवाजी सूर्यवंशी बीएससी सीएसच्या विद्यार्थिनींने डॉ. पी. आर. रोडिया, प्रा. जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माय सेलियम द जीवन रेखा, नोक-या पुरवणारे अॅप तयार करुन प्रकल्प सादर केला. ज्ञानेश्वरी मधुकर जाधव बीएस्सी. प्रथम जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थिनीने प्रा. सुरज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अगरबत्ती, साबण आणि अनेक प्रॉडक्टस् वापरलेल्या फुलांपासून निर्मिती करुन प्रकल्प सादर केला. विकास बालाजी शेलार या आयटी विभागातील विद्याथ्र्याने माती परीक्षण किट संयंत्र मॉडेल प्रा. विश्वनाथ पांचाळ व प्रा. ज्योती माशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन प्रकल्प सादर केला. तसेच सायन्स या डिसिप्लिनमधून महाविद्यालयातील संशोधक महेश कुमार विजयकुमार जाधव यांनी प्रा. डॉ. कुंदन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशिष्ट अशा केमिकल पासून सोलार सेल ची निर्मिती केली आणि वीज निर्मितीचा एक नवीन मार्ग मोकळा केला.
या यशाबद्दल शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, आयक्यू एसी समन्वयक, डॉ. अभिजीत यादव, अविष्कार समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर राठोड व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.