नवी दिल्ली : विमान प्रवास हा वेळ वाचवण्याचा उत्तम मार्ग आहे, परंतु भारतीय विमान कंपन्यांच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. नुकतेच इंडिगो एअरलाइन्सच्या पायलटला एका प्रवाशाने थप्पड मारली होती कारण धुक्यामुळे विमान धावपट्टीवर १३ तास अडकले होते. संतापलेल्या प्रवाशाने वैमानिकावर हल्ला केला. उड्डाणाला उशीर होणे किंव विमान रद्द होणे, भाड्यात प्रचंड वाढ आणि प्रवाशांच्या सामानाची समस्या सामान्य झाली आहे. दरम्यान, भारतात दरवर्षी हजारो उड्डाणे रद्द होत आहेत, यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री डॉ. व्हीके सिंग यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की, २०१७ पासून ५६,६०७ नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना ३१.८३ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. हा आकडा धक्कादायक असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. विशेषतः, व्यावसायिक बैठकी, वैद्यकीय आणीबाणी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. विमान उशीर आणि रद्द होण्यामागे अनेक कारणे दिली जातात. जसे की खराब हवामान, तांत्रिक बिघाड, वैमानिकांची कमतरता आणि कधीकधी विमान कंपन्यांकडून ओव्हरबुकिंग.
विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०२३ मध्ये भारतात १५.२ कोटीहून अधिक प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. नोव्हेंबरमध्ये यात ९ टक्क्यांची वाढ झाली आणि महिन्यात १.२७ कोटी लोकांनी हवाई प्रवास केला. दरम्यान, २०२३-२४ मध्ये ३७१ दशलक्ष प्रवासी आणि २०२४-२५ मध्ये ४१२ दशलक्ष प्रवासी उड्डाण करतील अशी अपेक्षा आहे. मात्र, अनेक प्रवासी विमान कंपन्यांच्या सेवेबाबत समाधानी नाहीत. जास्त भाडे, फ्लाइट रद्द होणे, उशीर होणे, हरवलेले आणि खराब झालेले सामान, फ्लाइटमधील महागडे खाद्यपदार्थ आणि कर्मचार्यांची खराब वागणूक अशा तक्रारी प्रवासी करत आहेत.