नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी वेबसाइट आणि ई-मेल आयडी जारी केला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी लोकांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्ष जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्ष आपल्या जाहीरनाम्यासाठी संवाद साधत आहे. लोकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीचा हा जाहीरनामा ‘जनतेचा जाहीरनामा’ असेल, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, लोकांकडून सूचना मिळविण्यासाठी हा उपक्रम आहे. काही आठवड्यात शक्य तितक्या सूचना घेतल्या जाणे महत्त्वाचे आहे. आम्हाला जाहीरनामा तयार करण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्यायचे आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोक आपले मत मांडतील अशी आशा आहे. आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्हाला या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यासाठी आमंत्रित करतो, जेणेकरून तो लोकांचा जाहीरनामा होईल. ”आवाजभारतकी डॉट इन” या वेबसाइटवर किंवा ”आवाजभारतकी एट द रेट ऑफ आयएनसी डॉट इन” या ईमेल आयडीवर सूचना दिल्या जाऊ शकतात.
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम म्हणाले की, प्रत्येक राज्यात किमान एक संवाद कार्यक्रम असेल. काही राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त जनसंवाद असू शकतात. ‘इंडिया’ आघाडीच्या मित्रपक्षांशीही संपर्क साधला जाईल का, असे विचारले असता, काँग्रेस नेते म्हणाले की ज्यांना संवादात सामील व्हायचे असेल त्याचे स्वागत आहे, मित्रपक्षांनी जाहीरनाम्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.