बंगळुरू : वृत्तसंस्था
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने थरारक विजय मिळविला. हा सामना कायमच लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर झाल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावांत बरोबरी झाली. त्यानंतर दुस-या सुपर ओव्हरमध्ये भारताने ११ धावा करत अफगाणिस्तान संघाला १२ धावांचे आव्हान दिले. मात्र, रवि बिश्नोईच्या जाळ््यात अफगाणिस्तानचे फलंदाज अडकले आणि तीन चेंडूमध्येच भारताने सामना जिंकला.
रवि बिश्नोईने तीन चेंडूमध्ये दोन विकेट घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला. त्यामुळे ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. कर्णधार रोहित शर्माने आज ट्वेन्टी ट्वेन्टीत शतक झळकावले. त्याचे हे टी-ट्वेंटीमधील पाचवे शतक ठरले. त्याने रिंकू सिंगच्या साथीने रचलेली १९० धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या तिस-या विजयात निर्णायक ठरली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचा डोंगर उभारला. या विराट आव्हानाला अफगाणिस्तानकडून जशास तसे उत्तर देण्यात आले. अफगाणिस्तान संघानेही २० षटकात २१२ धावांपर्यंत मजल मारत सामना बरोबरीत सोडला. त्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली. अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल भारतालाही १६ धावाच काढता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे दुरी सुपर ओव्हर घ्यावी लागली.
यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली. रवि बिश्नोईने फक्त ३ चेंडूत २ फलंदाजांना तंबूत पाठवत अफगाणिस्तानचा खेळ खलास केला. हा सामना सस्पेन्स, थ्रिल, पैसा वसूल करणारा ठरला. हजारो चाहत्यांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहणारा हा सामना झाला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने अवघ्या ६९ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावांची खेळी केली. त्याला रिंकू सिंगने नाबाद ६९ धावा करत चांगली साथ दिली. रिंकूने ३९ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. भारताने एकवेळ २२ धावांवर ४ फलंदाज गमावले होते. मात्र, रोहित-रिंकूच्या तब्बल १९० धावांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तान संघासमोर २१२ धावांचे आव्हान उभे केले. अफगाणिस्तान संघानेही कडवी झुंज देत २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानकडून गुरबाज, जादरन, गुलबादिन नैब आणि मोहम्मद नबी यांनी झंझावती खेळी केली. गुरबाज आणि जादरान यांनी ११ षटकात ९३ धावांची सलामी दिली.
रोहित-रिंकूच्या ९० चेंडूत १९० धावा
तत्पूर्वी तिस-या टी-ट्वेंटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची घसरगुंडी झाली. परंतु रोहित शर्मा आणि रिंकूने पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागिदारी केली. त्यांनी अवघ्या ९६ चेंडूत १९० धावा जोडल्या. यात रोहितने ११३ आणि रिंकूने ६९ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचीही अफगाणी फलंदाजांनी धुलाई केली. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली.
अखेरच्या पाच षटकात
१०३ धावांचा पाऊस
रोहित शर्मा आणि रिंकू सिंग याने अखेरच्या ५ षटकात १०३ धावांचा पाऊस पाडला. १६ व्या षटकात २२ धावा लुटल्यानंतर या जोडीने पुढील ४ षटकांतही धावांचा पाऊस पाडला. १७ व्या षटकात १३, १८ व्या षटकात १०, १९ व्या षटकात २२ आणि २० व्या षटकामध्ये ३६ धावा लुटल्या.
रोहित शर्माचे विक्रमी पाचवे शतक
बंगळुरूच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय्. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही.